उर्वी पब्लिक ट्रस्टची स्थापना नोव्हेंबर 2020 मध्ये झाली. भारतीय गावांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत घर बांधकाम पद्धती प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून उर्वीचे काम सुरू झाले जेणेकरून बांधकाम क्षेत्रात गावे स्वयंपूर्ण होऊ शकतील. त्याच बरोबर होतकरू डिझायनर्सना यासारख्या तर्कसंगत बांधकाम पद्धतीचे मार्गदर्शन देऊन साईटवर होणाऱ्या कामाचा अनुभव प्रदान करण्याचे कार्यही केले जाते.
२०१८- २०१९ साली जेव्हा मी आनंदवनात काम करत होते तेव्हा हा विचार प्रकर्षाने सतावत होता. डॉ. विकास आमटेंकडे आनंदवनात असताना जाणवले कि मला नाही राहायचे शहरात. शहरामध्ये ‘विकास’ घडवून आणायला architects ची संख्या कमी नाही. पण बांधकाम क्षेत्र माझ्या आवडीचे. त्यामुळे निश्चय केला कि माझ्या profession चा उपयोग गावांसाठी करावा. यामध्ये आनंदवनात सोबत असलेला माझा मित्र याने खंबीर साथ दिली. प्रसाद थेटे मूळचा लातूरचा. त्याचीसुद्धा गावांमध्ये काम करण्याची इच्छा होती. आम्ही सोबत काम करण्याचा निश्चय केला व ‘उर्वी’ नावाची समाजसेवी संस्था सुरु केली. याच दरम्यान तमिळनाडू च्या architect मिनाक्षी आनंदवनात होत्या. त्यांनी आम्हा दोघांना सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.
आनंदवनात माझे पर्यावरणपूरक बांधकामांचे प्रोजेक्ट चालू असताना प्रसाद ने केरळ मध्ये असलेला ‘kanthari’ नावाच्या संस्थेला अर्ज पाठवला. जगभरातून दर वर्षी इथे फक्त २० प्रोजेक्ट निवडले जातात. त्यामध्ये उर्वीची निवड झाली. kanthari मध्ये होतकरु समाजसेवी संस्थापकांना प्रशिक्षण दिले जाते. वर्षभराचा course करून प्रसाद आला आणि आमचे field-work सुरु झाले. या प्रशिक्षणाच्या आधारे प्रसादने The Nudge Foundation यांची देणगी मिळवली. या मार्फत आम्ही आदरणीय श्री. अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धी मध्ये pilot प्रोजेक्ट करायचे ठरवले. जानेवारी २०२० साली हा प्रकल्प यशस्वीरित्या आम्ही पूर्ण केला.
– अमृता नायडू
Team